आत्मदहन आंदोलन स्थगित, सांगलीत आज मनपा आयुक्तांसमवेत बैठक
प्रतिनिधी / मिरज
महापालिका मालकीचा बेडग रोडवरील कत्तलखाना बंद करावा, या मागणीसाठी सोमवारी मिरज पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्वपक्षीय सदस्य आणि कत्तलखाना परिसरातील ग्रामस्थांनी जोरदार निदर्शने केली. जिल्ह्यात जमावबंदी असल्याने आात्मदहन आंदोलन काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान, या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मनपा आयुक्तांनी सदर लोकप्रतिनिधींसमवेत बैठकीचे आयोजन केले आहे.
बेडग रोडवरील कत्तलखाना या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह आसपासच्या सात गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असल्याने तो कायमचा बंद करावा, यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आंदोलन हाती घेण्यात आले आहे. कत्तलखाना बंद न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे आज कत्तलखान्यासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिह्यात जमावबंदी लागू करण्यात आल्याने आंदोलकांनी कत्तलखान्यासमोर केवळ निदर्शने करुन महापालिका आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.