वार्ताहर / कसबे डिग्रज
काही महिन्यांपूर्वी सांगली शहरात बिबट्या आल्याची वार्ता अजून लोक विसरले नसतानाच आता सांगलीपासून जवळच असलेल्या कसबे डिग्रज ता. मिरज येथे पहाटे बिबट्या झाल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
सांगलीला लागून असलेल्या सांगलीवाडी व कसबे डिग्रज परिसरात बिबट्या आल्याची चर्चा आहे. कसबे डिग्रजला ऊसाच्या शेतात पावलांचे ठसे दिसले आहेत ते बिबट्याचे असावेत असे म्हटले जाते आहे. तर डिग्रजमार्गे तो सांगलीवाडी परिसरात आला असे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी राजवाडा चौक पटेलचौक या सांगलीच्या मध्यवस्ती परिसरात बिबट्या आढळला होता त्यास पकडून चांदोलीत सोडण्यात आले होते लॉकडाऊन आणि बदलले वातावरण या पाश्वभूमीवर बिबट्या कृष्णा-वारणा काठच्या दाट उसात रहिवास करुन पिलांना जन्म देत असल्याचे आढळले आहे. सांगलीत सकाळ पासून बिबट्याची चर्चा व दहशत आहे पण अद्याप प्रत्यक्षदर्शी कुणी पुढे आलेला नाही.
बिबट्या आल्याची बातमी समजताच वनविभाग आणि संबंधित लोकांनी येऊन तात्काळ पंचनामा केला आहे. बिबट्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळपासूनच वनविभागाने बिबट्याचा शोध सुरू केला. दरम्यान वन विभागाकडील माहितीनुसार हा बिबट्याच असल्याचे सांगण्यात आले.