प्रतिनिधी/कुंडल
कुंडल (ता.पलूस) येथील झरी पार्श्वनाथ पहाडालगत तीन नाग मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या परिसरात नागांची व विषाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची शक्यता असून या विष तस्करीची पाळेमुळे खणून काढणेची गरज आहे.
येथील झरी पार्श्वनाथ पहाड परिसरात फिरायला येणाऱ्या लोकांना दोन दिवसापूर्वी वनविभागाच्या हद्दीजवळील शेतातून दुर्गंधी येवू लागल्याने शोध घेतला असता प्लास्टिकच्या पोत्यातून मृतावस्थेतील तीन नाग टाकल्याचे आढळले. वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांना नागरिकांनी कळवले. त्यांच्या पथकाने येऊन पंचनामा करून मृत नागांना शवविच्छेदनासाठी घेऊन गेले.
या परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या विषारी सर्पांना पाहून हे नाग जाणीवपूर्वक कोणी तरी मारले असावेत अथवा भुकेने किंवा त्यांचे शोषण केल्याने ते मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृतावस्थेतील विषारी सर्प आढळून आले तेव्हा त्यांची कुजण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. असे एका जागी तीन नाग निघणे जसे दुरापास्त आहे तसेच तीन नागांचा एकाच वेळी नैसर्गिकरित्या मृत्यु होणे हे ही शंकास्पद असल्याने हा तस्करीचाच प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
नागांच्या विषाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे या परीसरातील काही तस्कर विषारी सर्पांची तस्करी करून अल्पावधीतच श्रीमंत होण्याचा मार्ग अवलंबत आहेत. यासाठी समाजातील लोकांनी तसेच प्राणी मित्रांनी अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. वन विभागाने या सर्व प्रकाराचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्राणीमित्रांकडून होत आहे.
जर कोणाला अशा तस्करांबाबत माहिती असेल तर ती वनविभागाला कळवावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. –मदन क्षीरसागर, वनपरिक्षेत्र अधिकारी, तासगाव