प्रतिनिधी / सांगली
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. लहान मुले, नागरिकाकांच्यावर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. दरम्यान आज भटक्या कुत्र्याने महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकवरच हल्ला केला. त्यांच्या चेहऱ्याचे लचके तोडले. श्रीकांत मद्रासी असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या स्वच्छता निरीक्षकाचे नाव आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये ही घटना घडली. स्वच्छता निरीक्षकावर झालेल्या हल्ल्यानंतर तरी महापालिका प्रशासनाला जाग येणार का असा सवाल स्थानिक नगरसेविका सविता मदने यांनी उपस्थित केला आहे. मदने म्हणाल्या, भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या बाबत आरोग्य विभागाकडे अनेक वेळा तक्रार केली. मात्र दखल घेतली जात नाही. लहान मुले, नागरिकच काय जनावरांच्यावरही कुत्री हल्ला करतात. आता तर स्वच्छता निरीक्षकच कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाले. एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार काय? असा सवालही मदने यांनी उपस्थित केला आहे.