कुपवाड / प्रतिनिधी
बेकायदा खाजगी सावकारीच्या माध्यमातून दिलेल्या दीड लाखाच्या रक्कमेवर तब्बल १५ टक्के व्याज आकारुनही हप्ते वसूलीसाठी सावकारांकडून एका महिलेचा छळ होत असल्याच्या गंभीर प्रकार मंगळवारी उजेडात आला.
याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी खाजगी सावकारी करणाऱ्या माय-लेकीसह जावयावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संशयित लता पाटील (रा. रामकृष्णनगर, कुपवाड), त्यांची मुलगी नेहा नंदकिशोर शिंदे व जावई नंदकिशोर शिंदे (दोघे रा.गांधी कॉलनी, लक्ष्मीनगर, सांगली) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नांवे आहेत. त्यांच्याविरोधात श्रीमती सविता महादेव गावड़े (वय ४२, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) यांनी फिर्याद दिली आहे. या तिघांनी मिळून गेल्या पाच महिन्यापासून व्याजाचे पैसे देण्याच्या कारणातून फिर्यादी महिलेस शिवीगाळ व दमदाटी करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सविता गावडे या बेकरी व्यवसाय करत असून कुटूंबासह रामकृष्णनगर येथे राहतात. गावडे यांनी संशयित लता पाटील यांनी त्यांच्या जावई नंदकिशोर शिंदे याच्याकडून दीड लाख रुपये दरमहा १५ टक्के व्याजाने पैसे घेतले होते. रक्कमेच्या मोबदल्यात गावडे यांनी शिंदे यांच्याकडे दोन तोळे सोन्याचे दागिने व शंभर रुपयांचा कोरा स्टॅम्प. त्यावर गावडे व त्यांची मैत्रीण शोभा कसबे यांच्या सह्या घेतल्या होत्या.
गावडे यांनी महिन्याला २२ हजार ५०० रुपये व्याज देत असतानाही तिघांनी मुद्दल रक्कम व उर्वरित व्याजाच्या वसूलीसाठी पाटील व शिंदें यांनी गावडे या महिलेला वारंवार शिवीगाळ व दमदाटी करून मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे समोर आले. याबाबत गावडे यांनी कुपवाड पोलिसांत तक्ररार दिली. त्यानुसार पोलिसांनी लता पाटील, नंदकिशोर शिंदे व नेहा शिंदे यांच्यावर सावकारी अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत संशयित सावकारांना अटक केली न्हवती. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.