महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची माहिती लवकरच महासभेत मान्यता
सांगली / प्रतिनिधी
कुपवाड ड्रेनेज योजनेचा २१३ कोटींचा आणि सांगली व मिरजेतील उर्वरीत भागातील ड्रेनेजचा १५ कोटींचा डीपीआर बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने महापालिकेला सादर केला. त्यास महासभेत मान्यता घेतली जाणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून या योजनेस निधी उपलब्ध करून घेतला जाणार आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कुपवाड ड्रेनेज योजना राबविण्यासाठी गतीने हालचाली सुरू झाल्या. पालकमंत्री जयंत पाटील व महाविकास आघाडीचे नेते यांच्या उपस्थितीत दि. २५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक झाली होती. मिरज ड्रेनेज योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले की कुपवाड ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव सादर करण्याचे ठरले होते. मिरज ड्रेनेज योजनेचे काम ९० टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे कुपवाड ड्रेनेज योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कुपवाड ड्रेनेज योजनेचा अपेक्षित खर्च २१३ कोटी रुपये आहे. डे्रनेजलाईनची लांबी २७० किलोमीटर आहे.