कुपवाड / प्रतिनिधी
कड़क लॉकडाऊन काळात बंद असलेल्या हॉटेल्स आणि दुकानांवर चोरटयांनी आपली नजर वळवली आहे. कुपवाड एमआयडीसीतील प्रियांका हॉटेल परमिट बार फोडून चोरटयांनी तब्बल आठ लाखाचा विदेशी दारूसाठा चोरल्याचे बुधवारी उघडकीस आल्याने हॉटेल व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलमालक रघुनाथसिंह छोटूसिंह राजपूत (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथसिंह राजपूत यांचे कुपवाड एमआयडीसीतील जेसन्स फाउंड्रीसमोर प्रियांका नावाने परमिट रूम बीअरबार हॉटेल आहे. लॉकडाऊनमुळे हे होटेल ६ मे पासून बंद आहे. हॉटेलमध्ये चोरी झाल्याची माहिती राजपूत यांना मंगळवारी मिळाली. त्यानुसार मालक राजपूत यांनी धाव घेऊन पाहणी केली असता हॉटेलच्या मागील बाजूस ग्रीलचा कोयंडा तोडून चोरटयांनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. चोरीच्या संशयावरुन मालकांनी याबाबत कुपवाड पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. यामध्ये अज्ञात चोरटयांनी ७ लाख ८२ हजार ७१४ रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बाटल्या यांसह एक संगणक, २ स्क्रीन व वायफाय मशीन मिळून ८ लाख ७ हजार ७१४ रुपयांची चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. याबाबत मालकाने कुपवाड पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक निरक्षक नीरज उबाळे करीत आहेत.