प्रतिनिधी/मिरज
मिरजेतील कृष्णा नदी पात्रात महाकाय मगरीचे दर्शन झाले. सुमारे 8 ते 10 फूट लांबीची ही मगर नदीच्या पाण्यातून म्हैसाळकडे गेल्याचे दिसले. पोहण्यासाठी आलेल्या तरुणांना मगर दिसताच त्यांची पळापळ सुरू झाली. या मगरीला पाहण्यासाठी कृष्णानदी पुलावर गर्दी झाली. यापूर्वीही अनेकवेळा मगरीचे दर्शन झाले आहे. नदीत आता पुन्हा मगर दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
मिरज कृष्णा घाटावर मोठ्या प्रमाणात तरुण पोहण्यासाठी येतात. तसेच परिसरातील महिला धुणे धुण्यासाठीही येतात. बुधवारी काही तरुण नदीत पोहत असताना नदीच्या मध्यभागी एक महाकाय मगर दिसली. तरुणांनी आरडाओरडा करून धुणे धुण्यासाठी आलेल्या महिलांना नदीपासून दूर नेले. त्यानंतर पुलावर येऊन पाहिले असता सुमारे दहा फूट लांबीची मगर म्हैसाळच्या दिशेने पोहोत जात असल्याचे दिसले. ही मगर पाहण्यासाठी कृष्णा नदी पुलावर मोठी गर्दी झाली होती.