प्रतिनिधी / सांगली
कोयना पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने २४ तासात ५ टीएमसी पाणी वाढल्याने रविवारी नियोजित वेळेच्या दीड तास आधीच २५ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू झाला असून तो दिवस भरात ४० हजार क्युसेक्सवर वाढणार आहे. तर चांदोली धरणातून १४३९५ क्युसेक्सने पाणी सोडले जाणार आहे. आलमट्टी धरणही भरत आले असून दीड लाखने विसर्ग सुरू झाला आहे.
कोयना, कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोयना पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 8.30 वाजले पासून 25604 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यात 11.00 वाजल्यापासून 35000 क्युसेक्सचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2.00 वाजता एकूण विसर्ग 40000 क्युसेक्स करण्यात येईल. आलमटी धरणातून दीड लाख क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.
वारणा धरण परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे रविवारी सकाळी 10.00 वाजता 11599 क्युसेक्स सांडव्यावरुन, पॉवर हाउस येथून 1385 असा एकूण 12984 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत होता. तो आता वाढवून 13101 सांडव्यावरुन व पॉवर हाउस येथून 1385 असा एकूण 14395 इतका विसर्ग करण्यात येणार आहे.