प्रतिनिधी / सांगली
राज्यात १ मे २०२१ पासून सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १८ वर्षावरील सर्वाना लसीकरण देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली विधानसभा क्षेत्रातील महानगरपालिका व जिल्हापरिषद अंतर्गत आरोग्य केंद्रास भेट दिली होती. कोरोनाच्या जनजागृती मुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे परंतु लसीकरण केंद्रावर समक्ष पाहणी करताना मोठ्या प्रमाणात नियोजनाची कमतरता व अभाव जाणवून आला यामध्ये प्रामुख्याने लसीकरण होते त्या ठिकाणीच आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्ट केली जात आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण हे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संपकार्त येतात त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तसेच लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींना बैठक व्यवस्था नाही. काही केंद्रावर वीज नसते अशा ठिकाणी इन्व्हरटर बसविणे गरजेचे आहे.
लसीकरण केंद्रावरती कर्मचारी वर्ग व लस देणारे आरोग्य कर्मचारी, डाटा एन्ट्री ओपरेटर यांची संख्या कमी आहे. लसीकरण केंद्रावर गर्दीवर नियंत्रण व सुरक्षित सामाजिक अंतर राखण्यासाठी १ पोलीस व १ होमगार्डची नेमणूक होणे गरजेचे आहे. काही केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची सोय नाही. खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी मिळाली आहे पण त्या ठिकाणी अत्यंत कमी संख्येने लसीकरण होत आहे त्या रुग्णालयांची सोशल मिडिया द्वारे जाहिरात व प्रसिद्धी करने गरजेचे आहे .
ऑनलाईन लसीकरण नोंदणी केली आहे त्यांना लसीकरण केंद्रावर प्रथम प्राधान्य देऊन लस देणे, प्रत्येक कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर निदान २ दिवस पुरेल एवढा लसीकरणाचासाठा उपलब्ध करून देणे तसेच गावाच्या लोकसंख्येचा आकडा विचारात घेऊन लस उपलब्ध करून देणे जेणेकरून केंद्रावर लसीकरणाचा अभाव निर्माण होणार नाही या सर्व गोष्टींचा अभाव आरोग्य केंद्रांवर पाहणी मध्ये आढळलेल्या बाबीनुसार आज आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बाबीवर आढावा घेतला व उपाययोजना करण्याबाबत सुचविणारे निवेदन दिले यावेळी जिल्हाधिकारी यांनी या सर्व मुद्द्यावर संबधित अधिकारी यांना सूचना दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय साळुंखे, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. मिलिद पोरे, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, विश्वजीत पाटील, अश्रफ वांकर श्रीकांत वाघमोडे आदि उपस्थित होते.