प्रतिनिधी / सांगली
अजितराव घोरपडे विद्यालयाचे कलाशिक्षक आणि प्रसिद्ध रांगोळीकार आदमअली मुजावर यांनी लॉकडाऊनचा काळ सत्कारणी लागावा म्हणून महामानवांची तैलचित्रे करण्यास सुरुवात केली. त्यातील शिवरायांच्या चित्राची 50 हजार रुपयांना विक्री झाली असून येणारी रक्कम ते मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देणार आहेत.
गेले सहा महिने मुजावर तैलचित्रांवर कष्ट घेत आहेत. छ. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बसवेश्वर, अहिल्याबाई होळकर, गौतम बुद्ध, अशी व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. पेंटिंगचे प्रदर्शन त्यांनी घरीच सुरू केले आहे. होणाऱ्या विक्रीतून खर्च वजा जाता राहिलेली सर्व रक्कम. कोरोना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा मानस आहे. सी.आर. सांगलीकर फाउंडेशनचे अध्यक्ष, उद्योगपती. सी.आर. सांगलीकर यांनी छत्रपती शिवाजीराजे यांचे पेंटिंग 50 हजार रुपये स्वागत मूल्य देऊन विकत घेतले आहे. त्याचबरोबर आरग गावचे अमर पाटी, पेठवडगावचे शिक्षक प्रदीप येवले, कळंबीचे ग्रामसेवक संदीप साळुंखे, शिक्षिका स्मिता माळी, उपशिक्षणाधिकारी मारुती लिगडे, सिद्धेवाडीचे सरपंच दादा वाघमोडे, डॉ. परमशेट्टी यांनीही पेंटिंग स्वागत मूल्य देऊन विकत घेतले आहे.
माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, शिक्षण प्रसारक मंडळ कळंबी चेअरमन. डी. एन. पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे. शिक्षणाधिकारी महेश चोथे, विस्ताराधिकारी प्रदीप, कोल्हापूरचे वित्त अधिकारी राहुल कदम, ॲडिशनल कलेक्टर अशोक पाटील आदींनी प्रदर्शनाला भेट दिली आहे. तैल रंगातील चित्रे शंभर ते दीडशे वर्षे टिकतात. कोणताही व्यावसायिक दृष्टीने न पाहता स्वागत मुल्यात चित्रे खरेदी करून कोरोना निधीसाठी साहाय्य करावे असे आवाहन मुजावर यांनी केले आहे.