माजी आमदार सदाशिव पाटील यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी / विटा
कोविडच्या उपचारासाठी खानापूर, आटपाडी तालुका आणि विटा शहरासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात. अतिरिक्त बेडस, व्हेंटिलेटर्स, प्राणवायु सिलींडर्स आणि रुग्णवाहीका या आरोग्य सुविधा देण्याची मागणी, माजी आमदार सदाशिव पाटील यांनी केली आहे. याबाबतच्या मागणीचे पत्र त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिले आहे.
याबाबत माजी आमदार सदाशिव पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मार्च 2020 पासून कोविड महामारीचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनासह आपण सर्वजण कसोशीचे प्रयत्न करतोय. खानापुर विधानसभा मतदारसंघ आणि विटा शहरामध्ये गेल्या चार महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर संक्रमण झालेले नव्हते. मात्र गेल्या तीन आठवड्यापासून खानापुर, आटपाडी तालुका आणि विटा शहरामध्येही सामाजिक संक्रमण सुरु झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गतीने वाढू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका प्रशासनाने आटपाडी आणि विटा येथे कोविड सेंटरच्या माध्यमातून उपचारांची व विलिगीकरणाची सोय केली आहे. मात्र कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या पहाता सद्य स्थितीमध्ये या सर्व सुविधा खूपच अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अनेक रुग्णांना बेड, प्राणवायु, व्हेंटिलिटर, रुग्णवाहीका मिळणे मुश्किलीचे झाले आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करता खानापुर, आटपाडी तालुके आणि विटा शहरासाठी अतिरीक्त बेड, व्हेंटिलेटर, प्राणवायु सिलेंडर्स, रुग्णवाहिका यांची आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने उपलब्धता करुन देण्याची गरज आहे, अशी मागणी माजी आमदार पाटील यांनी केली आहे.