लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केअर सेंटरमधील प्रकार, पोलीसांच्याकडून शोध सुरू
प्रतिनिधी / सांगली
सांगली शहर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील कैदेत असणारे गुन्हेगार राजू कोळी आणि रोहित जगदाळे रा. काळी वाट हरीपूर रोड, सांगली या दोघांनी लठ्ठे एज्युकेशनच्या कोविड केअर सेंटरमधून पलायन केले आहे. ही घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. पोलीसांनी तातडीने जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करून त्यांना पकडण्यासाठी शोध मोहिम सुरू केली आहे.
याबाबत हकीकत अशी की, कोरोना पॉझिटिव्ह असणाऱया कैद्यांना शहरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेत निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. याठिकाणी एकूण दहा कैदी आहेत. त्यामध्येच राजू कोळी आणि रोहित जगदाळे हे दोघेही उपचार घेत होते. पण पहाटे पाचच्यासुमारास ज्यावेळी या कैद्यांच्या शिरगिणती करण्यात येत असतानाच या दोघांनी पलायन केले. 19 सप्टेंबर रोजी त्यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागकडून अटक करण्यात आली होती. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. ही कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयाने कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते.
कारागृहात दाखल करत असताना त्यांची कोरोनाची चाचणी घेतली ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणाहून त्यांनी पळ काढला आहे. याबाबत कारागृहाचे प्रमुख अधिकारी सुशील कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच या कैद्यांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.