प्रतिनिधी/आटपाडी
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील प्रमोद सिद्धेश्वर सैब आणि सतीश कालिदास पुजारी यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याच्या विद्युत मोटारी चोरीस गेल्या होत्या. या मोटारी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. संतोष जालिंदर गायकवाड( चिंचाळे) आणि भागवत देविदास कटरे (खरसुंडी) यांना पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने अटक करून दोन विद्युत मोटारी व बुलेट असा ऐवज हस्तगत केला.
खरसुंडी गावच्या हद्दीतील शेतातील विद्युत पंप चोरीस गेले होते. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे, सपोनि सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ संजय परशकर, पोलीस नाईक संताराम वगरे, सचिन लोंढे यांच्यासह खरसुंडीतील पोलीस मित्र, शेतकरी, ग्रामस्थांनी सापळा लावला. चोरटे मोटरसायकलवरून विद्युत पंप विक्री करण्यासाठी खरसुंडी ते भिवघाट या रस्त्याने जाणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांना आरोपी संतोष व भागवत याला बुलेट वरून जाताना (एम-एच-10-एफ-4001) जाताना अडविले. त्यांच्याकडील पोत्यात एक विद्युत पंप आढळून आला. अधिक तपास केल्यानंतर आणखी एक चोरीची मोटर संतोष गायकवाड च्या घरासमोर लपवल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारी सह बुलेट असा सुमारे एक लाख वीस हजारांचा ऐवज हस्तगत करत दोघांना अटक केली.
कोरोना लॉकडाऊन काळात शेतातील विद्युत मोटारी चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी दोन चोरटे पकडले तरी त्यांची मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे.