पोलीस निरीक्षक संतोष डोके : खानापूरकरांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपावी : दर्ग्यात पाहणी
वार्ताहर / खानापूर
राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. खानापूर शहरातील हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम काही दिवसांवर आला आहे. मोहरम निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून गर्दी होणारे सर्व कार्यक्रम करण्यात येऊ नये. साध्या पध्दतीने गर्दी न करता मोहरम साजरा करावा, अशी सूचना विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी केली.
येथील औट पोस्ट परिसरात आयोजित हिंदू – मुस्लिम बांधव व पोलीस प्रशासनाच्या बैठकीत संतोष डोके बोलत होते. नगराध्यक्षा स्वाती टिंगरे, उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते राजेंद्र माने, वैभव राजमाने, पांडुरंग डोंगरे, शिवसेना तालुका प्रमुख दादा भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक डोके म्हणाले, खानापूर शहरातील मोहरम सणाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हे सण- उत्सव साजरे करण्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. राज्यातील सर्व गावातील यात्रा, जत्रा, कुस्ती मैदाने बंद आहेत. तरीही कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने जिल्ह्यात निर्बंध अजून कडक करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मोहरम साजरा करता येणार नाही. अशी सूचना संतोष डोके यांनी बैठकीत दिली.
पोलीस निरीक्षक डोके यांनी माँसाहेब दर्गा या ठिकाणी भेट देऊन पंजे स्थापना, ताबूत बसणे, कुस्ती मैदान याविषयी माहिती घेतली. यावेळी रामचंद्र देसाई, नसीर पिरजादे, व्यंकट भगत, राजेंद्र टिंगरे,अभिजीत टिंगरे, भाऊसाहेब पोरे, मन्सूर पिरजादे, अशोक धाबुगडे, पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील, महेश खिलारी, सुधाकर पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.