बामणी येथील घटना, दगड, कुऱ्हाड, कोयता, तलवार वापर, 15 जणांना अटक
प्रतिनिधी / मिरज
खून प्रकरणातील आरोपीचा फोटो फेसबूक स्टेटसवर अपलोड केल्यावरुन तालुक्यातील बागणी येथे दोन कुटुंबांत धारदार हत्यारे घेऊन शुक्रवारी रात्री तुफान राडेबाजी झाली. दगड, कोयता, कुऱ्हाड, तलवार आणि चाकू अशा धारदार हत्यारांचा या मारामारीत वापर करण्यात आला. याप्रकरणी प्रमोद कृष्णा मलमे (वय 29) आणि अतुल शिवाजी मलमे (वय 34) या दोघांनी मिरज ग्रामीण पोलिसांत परस्पर विरोधी फिर्याद दिली असून, पोलिसांनी दोन्ही गटाकडील 15 जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अतुल मलमे (वय 34), संभाजी मलमे (60), अतिश मलमे (22), दिपक मलमे (45), सदीप विलास मलमे (33), सर्जेराव मलमे (30), राजू मलमे (30), ऋतिष मलमे (20), सागर तानाजी मलमे (34), एकनाथ विजय मलमे (32), तानाजी दादू मलमे (60), दिनकर राजाराम मलमे (62), शिवनाथ विजय मलमे (30), विजय दादू मलमे (58) आणि मारुती कृष्णा मलमे (25, सर्व रा. बागणी) या 15 जणांचा समावेश आहे.
प्रमोद मलमे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ अविनाश मलमे याने त्यांच्याच भावकितील किरण मलमे याचा फोटो वाढदिवसा दिवशी फेसबुक स्टेटसवर अपलोड केला होता. मात्र, विकी मलमे याच्या खूनाचा राग मनात धरुन अतुल, संभाजी, अतिश आणि दिपक यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने हातात कुऱ्हाडी आणि कोयता घेऊन वार केले. तसेच संदीप, सर्जेराव आणि राजू यांच्या सांगण्यानुसार दगडाने मारहाण करुन जखमी केल्याचे म्हटले आहे.
तर अतुल मलमे यांच्या फिर्यादीनुसार, खून झालेला विकी मलमे हा त्यांचा चुलत भाऊ आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते गावातील चौकात थांबले असता त्यांनी अविनाश याला चुलत भावाच्या खून प्रकरणातील आरोपी किरणचा फोटो फेसबुकवर का ठेवलास, असा जाब विचारला असता ऋतिष, सागर, एकनाथ, तानाजी, दिनकर, शिवनाथ, विजय आणि मारुती यांनी तू कोण विचारणा, असे म्हणत हातात तलवार, चाकू आणि दगडे घेऊन मारहाण केली. तसेच अतुल यांच्या आई-वडीलांनाही मारहाण करुन जखमी केले. तसेच आता तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली असल्याचे म्हटले आहे.
याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटाकडील 15 जणांना अटक केली आहे. दरम्यान, फेसबुकवर फोटो टाकल्याच्या कारणातून दोन कुटुंबात सशस्त्र राडा झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता.