पुर्वसंध्येला बाजारात गर्दी, गणेश भक्तांमध्ये अलोट उत्साह, गणपती मंदिरावर आकर्षक रोषणाई , संस्थानच्या श्रीची उद्या प्रतिष्ठापना
सांगली/ प्रतिनिधी
सांगलीत गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घरोघरी गणरायाचे आगमन झाले. मारुती चौक, बालाजी चौक रोडवर गणेश मूर्ती, आरास साहित्य, पूजेचे साहित्य यांचे स्टॉल लागले होते. गुरुवारी शहरातील कापड पेठ, गणपती पेठ, गावभाग स्टॅंड परिसर, खणभाग, राममंदिर चौक परिसरातून भाविकांनी गणरायाची मूर्ती घरी आणली. पुष्पराज चौक येथील परिसरातही गणेशमूर्तीचे स्टॉल असल्याने तेथूनही मोठ्या प्रमाणात गणरायाच्या मूर्ती नेण्यात आल्या.
यंदाही कोरोना व महापुराच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असतानाच बुधवार व गुरुवार दोन्ही दिवशी बाजारात मोठी गर्दी दिसून आली. अनेकांनी आठवडाभर आधी बुकिंग करून गुरुवारी मूर्ती घरी आणली. तसेच हरितालिका व गणेशाच्या पूजेच्या आणि सजावटीच्या साहित्यांचीही मोठी उलाढाल झाली. गणेशाची उद्या शुक्रवारीही प्रतिष्ठापना होणार असली, तरी दिड दिवसाचे गणपती, तसेच काही उत्साही भाविकांनी सणादिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आधीच गणरायाला घरी आणले. विधिवत पूजा करून गणेशाची शुक्रवारीही अनेक घरगुती व सार्वजनिक गणरायांची प्रतिष्ठापना होणार आहे.
गणपती पंचायतन संस्थानमध्ये मंगळवारीच चोर गणपती विराजमान झाले आहेत. तर दरबार हॉल येथील उत्सव उद्यापासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गतवर्षीप्रमाणेच संस्थानमध्ये प्रतिष्ठापना व विसर्जन अत्यंत साधेपणाने होणार आहे. पाच दिवस कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसून, भाविकांना यंदाही श्रीचे दर्शन घेता येणार नाही. दरबार हॉल व मंदिर बंदच राहणार असल्याचे सांगण्यात आले.