वार्ताहर / कोकरूड
शिराळा तालुक्यातील चरण सोंडोली फाटा येथील धनश्री ट्रेडींग कंपनी किराणा दुकानात रोख रक्कम व मालासहित 31 हजार 600 रूपयेची चोरी केली असून कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोंडोली पुलामुळे चरण गावची बाजार पेठ नावारूपास येऊ लागल्याने व्यापारी, चरण सोंडोली फाट्यावर वेगवेगळी दुकाने सुरु करत आहेत. या ठिकाणी सोमनाथ पांडुरंग नायकवडी रा. चरण यांच्या मालकीचे धनश्री ट्रेडर्स कंपनी हे होलसेल व रिटेल किराणा दुकान आहे. रविवारी दुपारी चार वाजता हे दुकान बंद करण्यात आले, त्या रात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरची पट्टी तोडून दुकानातील रोख रक्कम10 हजार, सीसीटीव्हीची हार्डडिस्क किंमत 2000 हजार रुपये, व इतर साहित्य 19,600 रुपयांचे मिळून 31,600 रुपयांची चोरी केली आहे. दुकानाचे मालक सोमवारी सकाळी दुकान उघडायला आल्यावर चोरीची घटना निदर्शनास आल्यावर तातडीने त्यांनी पोलिसांना कल्पना दिल्यावर सपोनि ज्ञानदेव वाघ घटनास्थळी हजर झाले.
शेडगेवाडी फाटा येथील अंबिका ट्रेडिंग या दुकानात झालेली चोरी पोलिसांनी पाच दिवसात उघडकीस आणली होती. त्यामुळे या चोरीचा छडा किती दिवसात लागणार याकडे व्यापारी वर्गाच्या नजरा लागल्या आहेत. घटनेची नोंद कोकरूड पोलिसांत करण्यात आली असून अधिक तपास सपोनि ज्ञानदेव वाघ करीत आहेत.