वार्ताहर / कोकरूड
शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने आरळा-शित्तूर पूल व चरण-सोंडोली पूल हे दोन पूल पाण्याखाली गेले आहेत.
पश्चिम भागात शुक्रवारी व शनिवारी दुपारपर्यंत पावसाने जोर सुरूच ठेवला आहे.धरणात 36.65 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 91.21 टक्के भरले आहे. मागील 24 तासात 70 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणाच्या सांडव्यातून 13570 क्यूसेक्स व विधुत ग्रहातून 809 क्यूसेक्स असे मिळून 14379 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
वाढीव विसर्गाने आरळा-शित्तूर पूल, चरण सोंडोली पूल पाण्याखाली गेले असून बिळाशी-भेडसगाव पूल ही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. वारणा काठावरील पुराचे पाणी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुराचे पाणी वाढू लागल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.