सोन्याळ / वार्ताहर
जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील लिंगायत स्मशान भूमितील पत्र्याचे शेड गायब झाला आहे. अज्ञातांनी चोरी करून विक्री केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत जाडरबोबलादच्या वतीने उमदी पोलीस ठाण्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती असे की, जाडरबोबलाद गावशेजारी लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी असून या स्मशानभूमीत काही वर्षापूर्वी पंचायत समितीच्या स्वीय निधीतून पत्रा शेडचे बांधकाम करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी या शेडमधील लोखंडी यंगल आणि पत्रे चोरीस गेल्याची घटना घडली आहे.पत्रे चोरीस गेल्याने स्मशान भूमीची दुरवस्था झाली आहे.
जाडरबोबलाद गावांमध्ये लिंगायत स्मशानभूमीत पत्र्याचे पक्के शेड चोरीस गेल्याने पर्यायाने तेथे मृतदेह उघड्यावर जाळावा लागत आहे. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार शेड अभावी पुढे ढकलण्याची वेळ येते. त्यावेळी सर्वांची मोठी कोंडी होते.अशीच परिस्थिती जत तालुक्यातील अनेक गावांची झाली आहे. आजही अनेक गावांत पक्के स्मशान शेड नाही.मृतदेह उघड्यावर जाळले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांकडून या शेडची मागणी केली जात आहे. परंतु प्रत्येक वेळी शासनाकडील अपुऱ्या निधीची अडचण निर्माण होते.
जाडरबोबलाद येथील स्मशान शेड चोरीला गेल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य जिनेसाब उर्फ पपण्णा मणेरी यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केली आहे. यानंतर ग्रामपंचायत जाडरबोबलादच्या वतीने उमदी पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज देऊन या चोरीच्या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या चोरीच्या घटनेची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पपण्णा मणेरी यांच्यासह जनतेतून केली जात आहे.