केंद्रीय जीएसटी कार्यालयातर्फे कारखान्या सह इतर कर दात्यांचा ही सत्कार
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्याच्या जीएसटी महसुलात साखराळे येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर समूहाला पुन्हा एकदा प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. केंद्रीय जीएसटी, सांगली विभागातर्फे सहाय्यक आयुक्त किशोर गोहिल यांच्या हस्ते कारखान्याचे चीफ अकाउंटंट अमोल पाटील, डेप्युटी अकाउंटंट संतोष खटावकर यांचा गौरव पत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी परिक्षेत्र तीनचे सहाय्यक आयुक्त मोहन वाघ, सेवा निवृत्त अधीक्षक शीतल सम्बर्गीकर आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना किशोर गोहील म्हणाले कि, जिल्ह्यातील साधारणपणे २५ हजार कर दात्यांमध्ये गेली तीन वर्षे सातत्याने राजारामबापू पाटील सहकारी साखर समूह प्रथम क्रमांकावर आहे. एकूणच जिल्ह्याच्या जीएसटी महसुलात साखर उद्योगाचे महत्वपूर्ण योगदान असून कोरोना काळातही या उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात जीएसटी भरला जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे. त्याचबरोबर कास्टिंग, फौंड्री उद्योग, प्लास्टिक उद्योग इतर अन्न प्रक्रिया उद्योग यांचेही योगदान मोठे आहे.
वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी यावेळी बोलताना सर्वाधिक कर भरणाऱ्याचा सत्कार हा दर वर्षी जीएसटी दिन म्हणजे १ जुलैला केला जातो मात्र यावर्षी कोरोनामुळे एकत्रित कार्यक्रम न घेता वेगवेगळ्या वेळी अशा कर दात्यांचे सन्मान करण्यात येत आहेत. यावेळी सर्वाधिक कर भरणा करणारे उदगिरी साखर कारखाना, पारे, सतीश ट्रेडिंग कंपनी, तासगाव तसेच युएसके ऍग्रो सायन्स, कुपवाड यांचा ही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास केंद्रीय जीएसटी अधीक्षक रवींद्र कुलकर्णी, सिद्धार्थ गुप्ता, निरीक्षक प्रमोद कुशवाह, महेंद्र सिंग, पंकज बंसल, अविनाश गुप्ता, सेवा निवृत्त अधीक्षक प्रदीप पाटील, भरत घार्गे, राजारामबापू पाटील कारखानाचे असि. अकाउंटंट विजय कोळी, उदगिरी कारखान्याचे परचेस अधिकारी विक्रमसिंह माने, विजय एक्स्पोर्ट, तासगावचे विजय पाटील आदि उपस्थित होते. आभार प्रदर्शन अधीक्षक जयंत वाटवे यांनी केले.