महापौर दिग्विजय सूर्यवंशी : पालकमंत्री जयंत पाटील यांचे सहकार्य : कामांचे प्रस्ताव तयार करणार
प्रतिनिधी / सांगली
महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी या निधीस मंजुरी दिली आहे. लवकरच महापालिका क्षेत्रातील विकासकामांचे प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली. यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे मार्गी लागतील असेही ते म्हणाले.
महापौर सूर्यवंशी म्हणाले, सततच्या लॉकडाऊनमुळे मनपाच्या उत्पन्नात प्रचंड घट आली आहे. त्यामुळे विकास कामे करणे अडचणीचे झाले आहे. विकास कामांसाठी निधीची गरज होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून यापूर्वी 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 11 कोटींचा निधी मंजूर केला होता. यातून काही विकासकामे मार्गी लागली आहेत.
आता पुन्हा त्यांनी आणखी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे, असे सांगत महापौर सूर्यवंशी म्हणाले, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत 8 कोटी 86 लक्ष तसेच नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा योजनेअंतर्गत 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता 1 कोटी 21 लाख रुपयांच्या निधीचा यामध्ये समावेश आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे मार्गी लागतील. या कामांचे प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविणार आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहूल पवार, शेखर माने यांनी पाठपुरावा केल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
11 कोटींच्या कामांचे प्रस्ताव तयार
पालकमंत्र्यांनी यापूर्वी जिल्हा नियोजन समितीमधून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 11 कोटींचा निधी मंजूर केला होता. यामधून काळी खण सुशोभिकरण, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या दुरुस्तीसह अन्य विकासकामांचे प्रस्ताव तयार केले आहेत. सोमवारी होणाऱया महासभेत कामे निश्चित करण्यास मान्यता घेवून सदर प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात येणार आहेत.
दिग्विजय सूर्यवंशी, महापौर