नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांची मागणी
प्रतिनिधी / विटा
सांगली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी महिलांना बोलण्याची संधी मिळत नाही, याचा प्रामुख्याने विचार व्हावा, अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन विकास कामांची चर्चा केली.
पालकमंत्र्यांनी या बैठकीत महिला सदस्यांना प्रामुख्याने संधी द्यावी, असे निर्देश दिले.नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांनी विट्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बॉडी मॉर्चूरी युनिट हे बंद असल्याने त्वरित दुरुस्त करून सुरू करावे, अशी मागणी केली. नवीन आणखी एक युनिट आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
विटा परिसरातील नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी तालुक्यात एकच ई- सेवा केंद्र सुरु आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विटा नगरपरिषदेतील आधार केंद्र सुरू करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र करंजे येथे डॉक्टर आणि नर्सची उपलब्धता करून द्यावी, या विषयावर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्या मागण्या मान्य होतील, असे आश्वासन पालकमंत्री नामदार जयंत पाटील यांनी दिले असल्याचे नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.