प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाशी संलग्न असणार्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्यावतीने पत्रकार दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवार दि.७ जानेवारी रोजी राज्याचे सहकार, कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केला आहे, अशी माहिती संघटनेचे संघटक प्रकाश कांबळे आणि जिल्हाध्यक्ष शेखर जोशी यांनी दिली.
जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी पत्रकारीता आणि समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींचा पत्रकार दिनी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या वर्षी उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार समाधान पोरे, उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांना तर कोरोना काळात काम करणार्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.उदयसिंह पाटील, डॉ.पंकज बिंदूसार पलंगे, डॉ.शीतल धनवडे, उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार विट्याचे प्रसिध्द तरुण उद्योजक डॉ.शंकर बुधवाणी यांना तर उत्कृष्ट सामाजिक सेवेचा पुरस्कार सौ.कलावती पवार यांना देण्यात येणार आहे.
उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार कोकरुड (ता.शिराळा) येथील पत्रकार नारायण घोडे, उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स मिडिया पुरस्कार टीव्ही ९ चे राजेंद्र कांबळे आणि उत्कृष्ट वृत्तपत्रीय वितरण सेवेचा पुरस्कार तरुण भारतचे विजय तोरगलकर, उत्कृष्ट क्रीडा सेवेचा पुरस्कार आदित्यराज घोरपडे यांना देण्यात येणार आहे. गुरुवार सायंकाळी ५ वाजता पत्रकार भवन, शिव पॅव्हेलियन, राम मंदिर चौक येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त नितीन कापडणीस आणि राज्य पत्रकार संघटनेचे संघटक संजय भोकरे उपस्थित राहणार आहेत.