प्रतिनिधी / सांगली
तंत्रज्ञानाला हाताशी धरून शिक्षणात वेगवेगळ्या अॅप्स, सॉफ्टवेअर तसेच व्हिडिओ यांचा वापर व निर्मितीचा प्रयोग करणारे सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षक अमोल हंकारे यांचे राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा कौतुक झाले आहे. एनसीईआरटीने घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या वर्ड मॅचिंग या गेमचा ‘बेस्ट डिजिटल गेम’ प्रकारात राष्ट्रीय स्तरावरचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. देश पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून हंकारे यांनी सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद व केंद्रीय प्रायोगिकी संस्थान नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या 25 व्या आखिल भारतीय बाल ऑडिओ – व्हिडिओ आणि नवीन माहिती तंत्रज्ञान साहित्य स्पर्धा, आयसीटी महोत्सव २०२१ नुकत्याच घेण्यात आल्या. यामध्ये जिल्हा परिषद शाळा खोतवस्ती (थबडेवाडी) येथील शिक्षक अमोल किसन हंकारे यांनी लहान मुलांसाठी तयार केलेल्या वर्ड मॅचिंग या गेमचा ‘बेस्ट डिजिटल गेम’ प्रकारात राष्ट्रीय स्तरावरचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नुकतेच जाहीर झाले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.या महोत्सवामध्ये देशातील विविध शिक्षक, विद्यार्थी व अधिकारी यांनी भाग घेतला. वर्ड मॅचिंग गेममधून इंग्रजी मुळाक्षरे व त्यावरील शब्द यांच्या जोड्या लावत खेळत खेळत आनंददायी पद्धतीने स्वतः हाताळून अंतरक्रियात्मक व्हावा याप्रकारे या गेमची रचना करण्यात आल्याने हा गेम या स्पर्धेत अव्वल ठरला. याआधी लर्न विथ फन स्नेक अँड लेडर हा हंकारे यांनी बनवलेल्या गेम देश पातळीवर अव्वल ठरल्या आहेत. तसेच राष्ट्रीय खेळणी जत्रा या देशव्यापी उपक्रमातही त्यांच्या आठ गेम्सचा समावेश झाला होता. करोनाच्या महामारीमध्ये घरी बसून अभ्यास करण्यासाठी स्कॉलरशीप ५ वी, ८ वी, नवोदय अॅप त्यांनी तयार केली आहेत. या अॅपचा वापर स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना झाला आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थ्यांचा अंतरक्रियात्मक स्वयंअध्ययन केल्यामुळे संगणक स्वतः हताळला तर त्याचे अवधान चांगले राहून मुलांचे शिकणे सोपे होईल असा एक अनोखा प्रयत्न हंकारे यांनी केला. त्यांना या कामात विद्या प्राधिकरण पुणे, सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी , व आणि शाळेचे मुख्याध्यापक यांचे प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. तंत्रज्ञानाला हाताशी धरून शिक्षणात वेगवेगळ्या अॅप्स, सॉफ्टवेअर तसेच व्हिडिओ यांचा वापर व निर्मिती करण्याचा चांगल्या प्रयोगाचे अमोल हंकारे यांचे कौतुक होत आहे.