औद्योगिक क्षेत्राला दिलासा, कृष्णाव्हॅली चेंबरच्या मागणीला यश
कुपवाड / प्रतिनिधी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांसाठी बंद केलेला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा बुधवारपासून टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय मंगळवार दिनांक १ जून रोजी घेण्यात आला. या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कृष्णाव्हॅली चेंबरने वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर यश मिळाले, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी दिली.
सतीश मालू म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने कोरोना महामारीत ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तूटवडा जाणवत होता. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १४ एप्रिलपासून उद्योगक्षेत्राचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून तो कोविड हॉस्पिटलसाठी वापरण्यात यावा, असे आदेश दिले होते. त्यामुळे आरोग्य विभागाला अनेकांचे जीव वाचविण्यात यश मिळवता आले.
कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील फॅब्रिकेशन,फौड्री, इंजिनिअरिंग यासह अनेक उद्योगांना लागणारा ऑक्सिजन गॅस पुरवठा गेल्या ४८ दिवसापासून जिल्हा प्रशासनाने बंद केला होता. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योग बंद होते. त्यामुळे उद्योजकांचे मोठे नुकसान झाले. काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू कमी होवू लागल्याने ऑक्सीजनची मागणीही कमी होत आहे. त्यामुळे शासनाने उद्योगक्षेत्राचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी कृष्णाव्हॅली चेंबरने जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती.
त्या मागणीचा तातडीने विचार होऊन मंगळवारी दुपारी जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांची बैठक झाली.या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या व कृष्णा व्हॅली चेंबरने केलेल्या मागणीचा विचार होऊन जिल्ह्यातील उद्योगांना बुधवारपासून पूर्वीप्रमाणेच टप्याटप्याने ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी दिली.