शिवीगाळ करत वैद्यकीय साहीत्यही फेकून दिले, पोलिसात मात्र तक्रार नाही
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील टाकळी येथे कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दमदाटी करत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडील वैद्यकीय साहित्य रस्त्यावर फेकून देण्यात आले. या प्रकारानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मात्र, रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसात तक्रार दिली नव्हती.
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता ग्रामीण भागात डॉक्टर-आरोग्यसेविका आशा वर्कर्स काम करत आहेत. सर्वत्र आरोग्य कर्मचाऱ्यांचा देवदूत म्हणून सन्मान होत असताना टाकळी येथे मात्र, त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर रविवारी आरोग्य कर्मचारी संबंधीत महिलेच्या संपर्कातील नातेवाईकांची तपासणी करण्यासाठी आले होते.
त्यावेळी नातेवाईकांनी स्वॅब देण्यास नकार देत या आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने भयभीत झालेले आरोग्य कर्मचारी मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले असता, गावातील पदाधिकारी सदस्यांनी मध्यस्ती करत प्रकरण मिटविले. मात्र, या प्रकाराने कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱया आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण पोलिसात रात्री उशिरापर्यंत अधिकृत तक्रार दाखल झाली नाही.