अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून, कॉल डिटेल्स वरून लागला खुनाचा छडा, संशयित आरोपींची कबुली
प्रतिनिधी / जत
जत तालुक्यातील दरीबडची येथील दिलीप महादेव वाघे (वय. २६) या तरुणाचा खून एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तशी कबुली संशयित आरोपींनी दिली आहे. वाघे खूनप्रकरणी संशयित आरोपी यशवंत उजना हाक्के (वय. ६५), नवनाथ यशवंत हाक्के (वय .२७) दोघे सध्या रा. कागनरी, संजय तायाप्पा कोकरे वय. २३रा. मोटेवाडी (आसंगी तुर्क) या तिघा संशयित आरोपीना जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी, दिलीप महादेव वाघे हा मूळचा आसंगी तुर्क येथील रहिवाशी होता. तो दरीबडची येथे शेत जमीन घेऊन राहावायास होता. हाक्के यांची जमीन दरीबडची हद्दीत आहे. सध्या ते कागनरी येथे राहत आहेत. हाक्के कुटुंबाशी एका व्यवहारावरून संबंध निर्माण झाले होते. या संबंधातून दिलीप वाघे या अविवाहीत तरुणाचे यशवंत हाक्के यांचे कुटुंबातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या कारणावरून धुसफूस होती. गुरुवारी दिलीप हा हाक्के यांच्या घरी गेला होता. यावेळी दिलीप वाघे या तरुणाला हाक्के कुटुंबातील नवनाथ हाक्के, यशवंत हाक्के यांनी पाईप व काठीने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली होती. यात दिलीपचा मृत्यू झाला. दिलीपचा अपघात झाल्याचा भासवण्यासाठी गुरुवारी रात्री सिद्धनाथ व दरीबडची हद्दीतील वनक्षेत्रात रस्त्यावर टाकून, दिलीप च्या अंगावर मोटरसायकल टाकण्यात आली होती.
या घटनेची तातडीने माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक,गोपाळ भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते यांनी तपास सुरू ठेवला होता. अखेर कॉल डिटेल्स वरून या खूनाचा छडा पोलिसांना लावण्यात यश मिळाले आहे. शनिवारी तिघां संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी आरोपीने खून केल्या बाबतची कबुली दिली आहे.