माणुसकीचा मोराला लागला लळा, अधिवास नष्ट होऊ लागल्याने मोरांची लोकवस्तीकडे धाव
रमेश मस्के सावळज / सांगली
अत्यंत देखणा व आकर्षक रंगाचा तसेच राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असणाऱ्या मोराचे व त्याच्या नृत्याचे सर्वांनाच आकर्षण राहिले आहे. त्यांचा सुंदर पिसारा, देखणं रूप पाहण्याची सर्वांना एक पर्वणीच असते. हे नयनरम्य मोराचे सौंदर्य दहिवडीकर घरी बसून दररोज अनुभवत आहेत तसेच पिसारा फुलवून नाचतानाचे अद्भुत सौंदर्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील दहिवडी गावच्या लोकवस्तीत मोर नाचतानाचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. मोराचे सुंदर नृत्य व रंग पाहणाऱ्यांचे डोळे भारावून जात आहेत. अन्नाच्या शोधात आलेल्या मोराला माणुसकीने अन्न पाणी दिल्याने मोरला माणसांचा लळा लागला असून मोर लोकवस्तीत बिनधास्तपणे वावरत आहे.
मोर हा कुक्कुडवर्गीय पक्षी आहे. रंगीबेरंगी पिसारा असलेला मोर पावसामध्ये खूप सुंदर नृत्य करतो. दिवसेंदिवस मोरांची प्रजात दुर्मिळ होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत तासगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे व वनक्षेत्रात नागरिकांच्या अतिक्रमणामुळे झाडे कमी झाल्याने मोरांचा अधिवास नष्ट होऊ लागला आहे. त्यामुळे वन्य-पशुपक्षी लोकवस्तीकडे वळत आहेत. त्यामुळे अन्न व पाण्याच्या शोधात मोर गावात भटकंती करीत आहेत.
दहिवडी गावच्या डोंगराकडील लोकवस्तीत मोराचा वावर वाढला आहे. अनेक मोर अधिवास सोडून गावाच्या डोंगर परिसरात फिरत असतात मात्र त्यातला एक मोर गेली वर्षभर बिनधास्तपणे लोकवस्तीत वावरत आहे. कोंबड्यांबरोबर गावात फिरत आहे. अनेक लोक त्या मोराला दाणे व पाणी देत असल्याने या मोराला माणुसकीचा लळा लागला असून तो दररोज सकाळ-संध्याकाळ गावामध्ये येतो व तास-दोन तास गावात वावरतो. अनेक वेळा मोर पिसारा फुलवत नृत्य करीत असतो. हे नयनरम्य दृष्य पाहताना अनेकांचे डोळे भारवत आहेत. लहान मुले व नागरिक या नाचणाऱ्या मोरा बरोबर फोटो काढून हे आल्हादायक क्षण ठिपुन ठेवत आहेत.
जंगलातील वन्यप्राणी व पक्षी संग्रहालयात तसेच बागेमध्ये पहायला मिळतात मात्र दहिवडीमध्ये मोर हा सुंदर राष्ट्रीय पक्षी घरापर्यंत चालून येत आहे. गावात येणारा मोर सभोवताली वावरणाऱ्या लोकांना भीत नाही. लोक ही इतर प्राण्यांपासून मोराचे संरक्षण करतात. मोराला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याची दक्षता घेत असतात. मोर पाळण्यास व त्याची शिकार करण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र शासनाने व नागरिकांनी मोरांचा अधिवास टिकून राहावा यासाठी शेताभोवती मोरांना आकर्षित करण्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे व दुर्मिळ होत असलेल्या मोराच्या प्रजातीचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे.
ग्रामीण भागातील निसर्गसौंदर्याचा शहरी भागाला हेवा वाटावा असा आनंद दहीवडीकर घेत आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीत घर बसल्या राष्ट्रीय पक्षी मोराचे सौंदर्य व नृत्य नागरिक दररोज अनुभवत आहेत. प्रत्यक्ष घरापुढे येऊन नाचणाऱ्या मोराला पाहुन नाच रे मोरा दहिवडी गावात… नाच रे मोरा नाच… असं जणु बालचमू म्हणतं असावीत.