वार्ताहर / बोरगाव
शासनाने दिव्यांगांसाठी दिलेला ५% निधी दिव्यांगांसाठी आर्थिक हातभार आहे. तालुक्यामध्ये आदर्श ग्रामपंचायत म्हणून बोरगाव अग्रभागी आहे. बोरगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग व वंचित घटकांना मदतीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला हक्काची मदत मिळवून दिली. दिव्यांगांना दिलेला मदतीचा हात काळाची गरज आहे. वाळवा तालुक्यात दिव्यांगाना मदत स्वरूपात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणारी बोरगाव ग्रामपंचायत पहिली आहे असे प्रतिपादन गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले.
बोरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. सरपंच जयंती पाटील, उपसरपंच सूर्यकांत पाटील प्रमुख उपस्थित होते. जि. प. सदस्य जितेंद्र पाटील म्हणाले, शासनाने दिव्यांगासाठी दिलेल्या ५ टक्के निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या संकटाच्या काळात दिव्यांगांना मोठी मदत मिळाली. शासनाने दिलेल्या मदतीतून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू स्वरुपात मदत दिल्यामुळे दिव्यांग कुटुंबांना हातभार लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वंचित घटकांना कायम मदतीचा हात दिला जाईल.
दरम्यान, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे साहेब जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, सरपंच जयंती पाटील, उपसरपंच सूर्यकांत पाटील व मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच जयंती पाटील यांनी केले व आभार माजी उपसरपंच प्रमोद शिंदे यांनी मानले. यावेळी ग्रामविकास अधिकारी बादशाह नदाफ, वाळवा तालुका दिव्यांग प्रतिनिधी नागराज चाँदकोटी, ग्रामपंचायत सदस्य सचिन देसाई, शकील मुल्ला, संध्याताई लोंढे, मालोजी पाटील यांच्यासह सर्व दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होत्या.