भक्तीपूर्ण वातावरणात पुजा-आरती, कृष्णाकाठी भाविकांची गर्दी
प्रतिनिधी / सांगली
सांगलीत दीड दिवसाच्या घरगुती गणपतीला शनिवारी भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सांगली येथील सरकारी घाट, माई घाट, विष्णू घाट, सांगलीवाडी येथील शंकर घाटावर गणरायाची पुजा करुन ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात भाविकांनी गणेशविसर्जन करून बाप्पाला निरोप दिला.
कोरोना व महापुराच्या पार्श्वभूमीवर आलेल्या गणेश चतुर्थीस शहरात शांततेत व साधेपणाने उत्साहात सुरुवात झाली. गणेशचतुर्थीला मुर्तीची विधिवत पूजा व प तिष्ठापना करून काही भाविक पारंपारिक प्रथेप्रमाणे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस नऊ दिवस व अकरा दिवस गणरायाचा पाहुणचार करतात. दीड दिवस गणेशाचा पाहुणचार करणाऱ्या अनेक भाविकांकडून शनिवारी दुपारनंतर गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. या दीड दिवसाच्या गणेशाला गणेशचतुर्थीच्या पुर्वसंध्येला, तसेच मुख्य दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात घरी आणले होते. उत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी दिवसभर गणरायाचे घरोघरी आगमन झाले. मोरयाच्या जयघोषात बाप्पाचे स्वागत करुन मोठ्या भक्तिभावाने त्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. शनिवारी दुपारनंतर या दीड दिवसाच्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या’ असा आग्रह करीत निरोप देण्यात आला.