कोरोना नियमांचे उल्लंघन; ७५ हजारांचा दंड वसूल
प्रतिनिधी / सांगली
कोरोना नियमांचे उल्लंघन तसेच प्लास्टिक वापरल्याबद्दल शहरातील दोन हॉटेलसह एका बेकरीवर महापालिकेच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सुचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. दरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक करवाईबरोबर प्रसंगी आस्थापना, दुकाने सील करू असा इशारा उपायुक्त रोकडे यांनी दिला आहे.
महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी आस्थापना, हॉटेल यांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. यानुसार आज उपायुक्त राहुल रोकडे यांच्या टीमने रस्त्यावर उतरत खासगी आस्थापना, हॉटेलवर छापासत्र सुरू केले आहे.
सांगलीतील अनेक मोठी हॉटेल, नाष्टा सेंटर यांच्यावर धाड टाकत तेथे सोशल डिस्टन्सचे पालन होत आहे का? ग्राहक, कर्मचारी मास्क परिधान करून आहेत का याची तपासणी करण्यात आली. अनेक हॉटेल मध्ये कर्मचारी विनामास्क आढळून आले तर सोशल डिटन्सचे उल्लंघन करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली.
शहरातील हॉटेल नटराजला १० हजार , हॉटेल सीप अँड स्नॅक्सला सोशल डिस्टन्स उल्लंघन आणि नियमबाह्य प्लास्टिकसाठी ४५ हजारचा दंड तर सफा बेकरीवर सोशल डिस्टन्सचा भांग केल्याबद्दल २० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, अतिक्रमण अधिकारी तथा सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, वैभव कुदळे आदींनी ही कारवाई केली.