आयुक्तांना पत्र; काळ्या यादीत टाका
प्रतिनिधी / सांगली
अत्यंत कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांकडून परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट भरून घ्यावे. जे ठेकेदार परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट भरणार नाहीत, अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजपा गटनेते विनायक सिंहासने यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्ते बांधणी, गटारी बांधणे, मोठे नाले बांधणे, सार्व. शौचालये, मुतारी बांधणे व इतर बांधकाम विषयी कामे केली जातात. सदरची कामे निविदा पध्दतीने करणेसाठी बांधकाम विभागाकडून जाहिर निविदा मागवून केली जातात. सदर कामांचा दर्जा उत्तम व टिकाऊ असणे आवश्यक असते. मक्तेदारांने भरलेल्या निविदा दरानुसार कामे करुन घेतली जातात. परंतू सद्या मक्तेदार अत्यंत कमी दराने निविदा भरुन कामाची अडवणूक करतात. अशा ठेकेदारांकडून परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट भरून घ्यावे अशी मागणी सिंहासने यांनी पत्राद्वारे केली आहे.