प्रतिनिधी / सांगली
पलूस शहरासह प्रभाग एकमध्ये मदने वस्ती भारतीनगर, शिवदत्त कॉलनी या भागात डेंग्यू सदृश साथीने थैमान घातले आहे. कोरोना सारख्या महाभयंकर साथीचे रूग्ण वाढत असताना पलूस शहरात डेंग्युने थैमान घातले आहे. याकडे पलूस नगर परिषदेने लक्ष दयावे अशी मागणी शिवसेनेच्यावतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन होत नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून या परिणाम लोकांच्या आरोग्यावर होवू लागला आहे. प्रभाग क्रमांक एक मध्ये सहा ते सात जणांना डेंग्युसदृश्य आजाराची लागण झाली आहे. मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष देवून योग्य ती उपाय योजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेला देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की,
पलूस नगरपरिषद होवून चार वर्षे झाली पण प्रभाग एक मधील शिवदत्त कॉलनी ते भारती नगर परिसरात प्रचंड सांडपाणी रस्त्यावर आले आहे. अतिशय दुरवस्था झाली असून प्रशासनाने याठिकाणी योग्य त्या उपाय योजना कराव्यात.
नगर परिषदेकडून तात्पुरते उपाय योजना केली जाते यावर ठोस उपाय योजना करून येथील सांडपाण्याचा निचरा करण्यात यावा. जेणे करून डास वाढणार नाहीत अशी व्यवस्था नगरपरिषदेने करावी. येत्या चार दिवसात कोणतीही उपाय योजना न झाल्यास शिवसेना आंदोलन करेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तर त्याला पलूस नगरपरिषद जबाबदार राहील, असा इशारा प्रशांत लेंगरे यांनी दिला आहे. निवेद देततेवेळी दीपक शिंदे, अक्षय होनकळसे, प्रवीण गलांडे, अक्षय माने, किरण माळी, महेंद्र पोतदार, जगदीश पवार, विशाल शिंदे, गणेश माने आदी उपस्थित होते.