हजारो मासे मृत, पशू-पक्षांना धोका
पलुस / प्रतिनिधी
पलूस नगरपरिषद हद्दीतील इंगळे पाझर तलावमध्ये कुणीतरी विषारी पदार्थ टाकल्याने हजारो लहान मोठे मासे मृत झाले आहेत. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तरी नगरपरिषदेने गंभीर दखल घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे. हा पाझर तलाव जिल्हा परिषद छोटा पाटबंधारे विभागाकडे येत असल्याचे समजते. परिसरातील विहरींची जलपातळी वाढावी यासाठी उन्हाळ्यात पलूस नगरपरिषदेकडून आरफळचे पाणी पवार पाझर तलावातून या इंगळे पाझर तलावात घेतले जाते.
या तलावाचा वापर जनावरांना पाणी पिण्यासाठी होत असतो, शिवाय या ठिकाणी चमचा, हळदी कुंकू बदक, बगळा, टिटवी, पानकावळा, शेकाट्या, ढोकरी बगळा अशा अनेक स्थानिक पक्षांबरोबर तुतवार, धोबी, चिखल्या अशा हिमालयीन पाहुण्या पक्षांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. या पाण्यातील विषप्रयोगामुळे सर्व पशूपक्षांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.