प्रतिनिधी / सांगली
पेन्शनर्सना eps-95 नुसार तीन हजार रुपये निवृत्तीवेतन, महागाई भत्त्यासह देण्याची तत्कालीन खासदार व सध्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची शिफारस आणि भाजपला घोषणा पत्राचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभर सर्व श्रमिक संघ भाजप कार्यालयावर दहा मार्च रोजी सांगली भाजप कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती संघटनेचे नेते गोपाळ पाटील यांनी दिली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोषारी राज्यसभेचे खासदार असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने सर्वसामान्य निवृत्ती वेतन धारकांना दरमहा किती निवृत्ती वेतन द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी समिती नेमली होती. त्यानुसार प्रतिमाह तीन हजार रुपये महागाई भत्यासह देण्याची शिफारस करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपने ही शिफारस अमलात आणायची घोषणा आपल्या घोषणापत्रात केली होती. मात्र गेले सात वर्ष भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजप प्रवक्ते म्हणून घोषणा करणारे प्रकाश जावडेकर सध्या केंद्रात मंत्री आहेत मात्र तेही सरकारला स्मरण करून देत नाहीत. राज्यपाल कोषारी निवृत्तीवेतन धारकांच्या संघटनेला वेळ देत नाहीत. त्यामुळे आता राज्यभरातील सर्व भाजप कार्यालयावर निवृत्तीवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा काढण्याचा निर्णय सर्व श्रमिक संघाने घेतला आहे.
या आंदोलनाबाबत पेन्शनधारकांना जागृती निर्माण व्हावी म्हणून 23 ते 7 फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात पेन्शनर्स जागृती सभा घेतल्या जाणार असल्याची माहिती संघटनेचे नेते गोपाळ पाटील यांनी दिली. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी नाथ मंदिर विटा, अण्णा महाराज मठ तासगाव, विठ्ठल मंदिर बुधगाव, 24 रोजी योग भवन इस्लामपूर, धोंडीराज मंदिर पलूस, 25 रोजी कॅडर ऑफिस जत, महांकाली मंदिर कवठेमंकाळ, 26 रोजी अंबाबाई मंदिर शिराळा, एक मार्च रोजी तांबडा मारुती मंदिर आटपाडी, 7 मार्च रोजी डॉक्टर आंबेडकर उद्यान मिरज आणि श्रमिक कार्यालय सीताराम नगर सांगली येथे पेन्शनरांच्यि सभा होणार असून जास्तीत जास्त सभासदांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन गोपाळ पाटील यांनी केले आहे.