आयुक्त, उपायुक्त रस्त्यावर; दहा व्यक्तीवर कारवाई
प्रतिनिधी / सांगली :
कोरोना नियमांची कडक अंमलबजावणीसाठी पोलिसांनी धडक कारवाई केल्यानंतर सांगली महापालिका प्रशासनाला जाग आली. शुक्रवारी आयुक्तासह अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले. विनामस्क फिरणाऱ्या १० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर एका चहा विक्रेत्यावरही कारवाई करण्यात आली. दरम्यान कोरोना नियंत्रणासाठी नागरिक, व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रात विशेषतः सांगली शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण ठेवण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. विशेष म्हणजे कोरोना नियंत्रणासाठी विविध प्रतिबंधक उपाय योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करुनही कोरोना नियंत्रणात येत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना नियमांच्या अंमलबजावणीसाठी अनेक पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मात्र नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी काही पथकांनी केवळ दंडात्मक करवाईवर भर दिला आहे.
नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. गुरुवारी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत धडक कारवाई केली होती. यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली. शुक्रवारी आयुक्तांसह अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले. गणपती पेठ, बालाजी चौक, कापडपेठ परिसरात पाहणी करत विनामस्क फिरणाऱ्या १० व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. एका चहा विक्रेत्यावरही कारवाईचा बडगा उगरण्यात आला. आयुक्त, उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.