प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथे किरकोळ झालेल्या भांडणातून पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात धरुन सुनिल पंडीत वाघमारे (वय 39) यांना लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी करण्यात आले आहे. याबाबत त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, अनिल रामचंद्र चंदनशिवे (रा. माळी वस्ती, सुभाषनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सुनिल वाघमारे आणि अनिल चंदनशिवे हे सुभाषनगर येथे एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला होता. त्यावेळी वाघमारे यांनी अनिल चंदनशिवे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास चंदनशिवे हा वाघमारे यांच्याजवळ आला. त्याने वाघमारे यांना तू आमच्या विरोधात पोलिसात तक्रार का दिलीस, असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी रस्त्यावर पडलेली लोखंडी पाईप घेऊन वाघमारे यांच्या गळ्यावर आणि डाव्या हातावर मारुन जखमी केले. याबाबत वाघमारे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, अनिल चंदनशिवे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.