भारताचा मित्रभा गुहा तृतीय स्थानी
प्रतिनिधी / सांगली
पुरोहित चेस अकॅडमी, सांगली आणि विश्वगंगा चेस अकॅडमी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने फिडे पंच पवन राठी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केल्या गेलेल्या ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये इराणचा फिडे मास्टर शाहीन सादेह हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने ९१ गुणांसह विजेतेपद पटकावले. यामध्ये भारतासह अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन, अर्मेनिया, उझबेकिस्तान, रशिया यांसह अनेक देशातील ग्रँडमास्टर्स, आंतरराष्ट्रीय मास्टर्स, फिडे मास्टर्स सहभागी झाले होते.
यावेळी इराणचा फिडे मास्टर शाहीन सादेह हा या स्पर्धेचा विजेता ठरला. तर आर्मेनियाचा फिडे मास्टर एमीन ओहान्यान हा ९० गुणांसह उपविजेता ठरला. पश्चिम बंगालचा आंतरराष्ट्रीय मास्टर मित्रभा गुहा यास ८२ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. पश्चिम बंगालचाच आंतरराष्ट्रीय मास्टर अरण्यक घोष यास ७३ गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. पश्चिम बंगालचा ग्रँडमास्टर दिप्त्यान घोष यास ७२ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले. अज़रबाइजानचा ग्रँडमास्टर एलताज सफार्ली यास ६५ गुणांसह सहावे स्थान प्राप्त झाले. केरळचा फिडे मास्टर जुबिन जिम्मी यास ६५ गुणांसह सातवे स्थान प्राप्त झाले. रशियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर विचेस्लाव मिखाईलो यास ६३ गुणांसह आठवे स्थान प्राप्त झाले. आर्मेनियाचा कँडीडेट मास्टर रॉबर्ट पिलीपोसॅन यास ६० गुणांसह नववे स्थान प्राप्त झाले. पश्चिम बंगालचा मानांकित खेळाडू कौस्तुव कुंदू यास ६० गुणांसह दहावे स्थान प्राप्त झाले.
पुणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सचिव राजेंद्र कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली गेली. तसेच आंध्रप्रदेश येथील नामांकित खेळाडू आणि प्रशिक्षक मस्तान बाबू यांच्या मार्फत ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली. तांत्रिक पंच म्हणून श्रेयस विवेक पुरोहित, दीपक वायचळ आणि शार्दूल तपासे यांनी काम पाहिले.