मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केली दंडात्मक कारवाईची माहिती
प्रतिनिधी / मिरज
कोरोनामुळे केवळ लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यातून आरक्षित प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असताना मे महिन्यात तब्बल ४ हजार ३४७ प्रवाशी विनातिकीट फुकटात प्रवास करताना आढळून आले आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने या फुकट्या प्रवाशांकडून १७ लाख, २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला असून, या दंडात्मक कारवाईची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे.
कोरोनाच्या प्रकोपामुळे आधीच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना ब्रेक द्यावा लागला असल्याने आर्थिक तोट्यात असलेल्या रेल्वेला फुकट्या प्रवाशांचा सामना करावा लागत होता. शेकडो प्रवासी विनातिकीत प्रवास करताना आढळून आले होते. अनेक प्रवासी हे समान वाहतुकीचे तिकीट न काढता विनापरवाना अवजड साहित्य रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक करताना आढळून आले होते.
मध्य रेल्वे पुणे विभागाच्या प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा, अपर मंडल रेल प्रबंधक सहर्ष बाजपेयी यांच्या आदेशानुसार वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, श्याम कुलकर्णी, सहायक वाणिज्य प्रबंधक एस. व्ही. एन. सुभाष यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली. मे महिन्यात या पथकाला मध्य रेल्वे पुणे विभागाच्या विविध रेल्वे स्थानकांवर ४ हजार ३४७ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १७ लाख, २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच विना परवानगी अवजड माल वाहतूक केल्याप्रकरणी ४१ प्रवाशांकडून १२ हजार रुपयांचा दंड वसूल केला.