सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेलाही अशाच पद्धतीने आर्थिक गंडा
पोलिसांची छापेमारी, अद्याप आरोपी फरार
प्रतिनिधी / मिरज
तारण ठेवलेल्या बेदाण्याची परस्पर विक्री करुन बडोदा बँकेच्या मिरज शाखेची 16 कोटी, 97 लाख रुपयांची फसवणूक करणारे आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. मुंबईपासून सांगलीपर्यंत हे रॅकेट कार्यरत होते. याच आठ जणांच्या टोळीने यापूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेलाही अशाच पद्धतीने आर्थिक गंडा घातला होता. बडोदा बँक प्रकरणानंतर पोलिसांनी छापेमारी सूरु केली असून, अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती सापडला नाही.
निरुपमा पेडूरकर (रा. मुंबई), अजित नारायण जाधव (रा. हसनी आश्रमजवळ, सांगली), प्रद्युम्न बाळगोंडा पाटील (रा. वसगडे), राहूल गणेश मित्तल, मिरा दिनेश मित्तल (दोघे रा. माधवनगर, बायपास रोड) दीपक मधुकर गुरव (कवठेएकंद), गणेश सोपान पवार (तानंग), प्रशांत प्रकाश निकम (तासगांव) या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. यासाठी सांगली, माधवनगर, तानंग, कवठेएकंद आणि तासगाव येथे पोलिसांनी छापा टाकला. मात्र, यापैकी एकही आरोपी पोलिसांना मिळून आला नाही.
एक कंपनी, आठ जणांचे रॅकेट
दरम्यान, या फसवणूक प्रकरणाच्या तपासातून वेगळीच माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. मुंबईस्थित निरुपमा पेडूरकर ही महिला सिएनएक्स ही कंपनी चालविते. या कंपनीने विविध जिल्ह्यात शीतगृहे उभारली आहेत. उर्वरित सात जणांची या कंपनीत भागीदारी आहे. शेकऱ्यांनी शितगृहांमध्ये ठेवलेला शेतमाल बँकांना दाखवायचा आणि कर्ज प्रकरणे मंजूर करून घ्याची. कर्जाचे पैसे मिळताच शेतमाल परस्पर विकून टाकायचा असा उद्योग सुरू होता. याच रॅकेटने यापूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही अशाच पद्धतीने गंडा घातल्याचे पोलिसांकडून संगण्यात आले.