प्रतिनिधी / सांगली
मिरज तालुक्यातील कवलापूर येथील एका बालिकेची छेड काढल्याच्या रागातून चौघांनी या छेड काढणार्या परप्रांतिय कामगाराचा खून केला आहे. खून झालेल्या परप्रांतिय कामगाराचे नाव कुंदन कुमार उराव (23) सध्या रा. कवलापूर, मूळ गाव जाफरागंज, बिहार आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली.
कुंदन हा कवलापुरात सध्या राहतो. लॉकडाऊन असल्याने कोठेच काम नसल्याने तो घरीच होता. सोमवारी रात्री त्यांने घराजवळील एका बालिकेची छेड काढली त्यामुळे तिने याची माहिती तिच्या कुंटुंबियांना दिल्यानंतर या कुंटुंबियांमधील काही युवकांनी कुंदन याला जाब विचारला. यातून वादावादी होवून कुंदन याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. हे चौघेजण तेथून पळून गेले. त्यानंतर जखमी कुंदन याला शेजाऱयांनी वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत तो मयत झाला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. अद्यापही यामध्ये कोणालाही अटक करण्यात आली नाही. पण या खूनाची नोंद मात्र सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.