प्रतिनिधी / सांगली
सांगलीवाडी येथे अल्पवयीन मुलाचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन यांच्या माध्यमातून जिल्हा बाल संरक्षण कक्षाला प्राप्त झाली. याबाबतीत तातडीने पावले उचलून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने एक पथक घटनास्थळी जावून पोलिस व संबंधित यंत्रणांच्या मदतीने होणारा नियोजित बालविवाह थांबविण्यात यश आले.अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बी. टी. नागरगोजे यांनी दिली.
बालविवाह रोखणाऱ्या पथकामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे, बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, चाईल्डलाइन चे समन्वयक दादासाहेब खोगरे, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल श्रीमती जाधव यांचा समावेश होता.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याबाबत बंधपत्र संबंधित पालकांच्याकडून लिहून घेण्यात आले. मुलीचे व पालकांचे याबाबतीत समुपदेशन करण्यात आले. लहान वयात लग्न केल्याने बालिकेच्या आरोग्यावर काय परिणाम होतात याबाबतची सविस्तर माहिती समुपदेशनाच्या माध्यमातून संबंधित पालकांना देण्यात आली. त्यानंतर बालविवाह घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाला व मुलीला बाल कल्याण समिती सांगली यांच्यासमोर सादर करण्यात आले.