वार्ताहर / बोरगाव
वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील ग्रामदैवत श्री बलभीमची दिपावली पाडवा-भाऊबीज निमित्त होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय यात्रा कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
ग्रामदैवताची सालाबादप्रमाणे होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आटोक्यात आलेली रुग्णसंख्या व पुन्हा नव्याने वाढत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. त्यामुळे दिपावली पाडवा व भाऊबीज अशा या सणासुदीच्या काळात सोशल डिस्टन्स पाळून गर्दीला टाळण्यासाठी केवळ यात्रेनिमित्त होणारे धार्मिक कार्यक्रम पुजारी व मानकरी या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत.
या काळात मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक राहणार असून विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दिवाळी उत्सव फटाक्यांची अतिषबाजी आणि भाऊबीज यासाठी चालू वर्षी महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी स्वतःवर मर्यादा घालून घ्याव्या तसेच स्वतःचे कुटुंब सुरक्षित ठेवून हा उत्सव सण साजरे करावे. असे आवाहन या वेळी यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच माणिकराव शा.पाटील, उपसरपंच सूर्यकांत पाटील, संजय पाटील, माजी उपसरपंच प्रमोद शिंदे, पै विलासराव शिंदे, यात्रा कमिटी खजिनदार सुनील पाटील, विकास सूर्यवंशी, सचिन देसाई यांच्यासह यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.