प्रतिनिधी /इस्लामपूर
जमिनीचे पोट हिस्से पाडण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्र व खोटे संमतीपत्र तयार केल्याप्रकरणातील भूमिअभिलेखच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांचा अटकपूर्व जामिन अर्ज पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश शेखर मुनघाटे यांनी फेटाळले.
भूमिअभिलेख विभागातील उपाधिक्षक अशोक दगडू चव्हाण, अमितकुमार नथू बांडे या अधिकाऱ्यांसह रोहन सुनिल शिंगण (रा. गांधी चौक इस्लामपूर), अशी या गुन्ह्यातील संशयीतांची नावे आहेत. सुनिल सुभाष पवार(३३.रा.महात्मा फुले हायस्कुलजवळ, इस्लामपूर) यांच्या हिस्स्यातून सार्वजनिक रस्ता आहे. हे भासवण्यासाठी खोट्या सह्या घेवून खोटा अहवाल दोन अधिकाऱ्यांनी तयार केला होता. याप्रकरणी पवार यांनी खासगी फिर्याद दाखल केली होती. त्यावर न्यायाधीश कैलास कुरंदळे यांनी पोलिसांना फिर्याद दाखल करुन घेण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी भा.द.वि.स कलम १२०ब, ४२०,४६५,४६८,४७१ व ३४ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायाधीश मुनघाटे यांच्याकडे धाव घेतली. सहा. सरकारी वकील रणजित एस. पाटील यांनी अर्ज नामंजूर करण्यासाठी युक्तिवाद केला. न्यायाधीश मुनघाटे यांनी तिघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले.