राज ठाकरे यांच्याकडून दखल; जोमाने काम करण्याच्या सूचना
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह नाराज पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यापुढे पक्षाचे काम जोमाने करण्याच्या सूचनाही दिल्या. पक्ष वाढला पाहिजे यासाठी जबाबदारीने काम करा, काही अडचण असल्यास थेट संपर्क साधा असेही ठाकरे यांनी सांगितले आहे, अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष संदीप टेंगले, सचिव आशिष कोरी, सांगली शहराध्यक्ष दयानंद मलपे, कुपवाड शहर सचिव सागर चव्हाण, महापालिका क्षेत्राध्यक्ष विनय पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या पदांचे राजीनामे दिले होते. जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केल्यानंतर मनसेमध्ये खळबळ माजली होती. दरम्यान पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत राजीनामा दिलेल्या टेंगले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना थेट ‘कृष्णकुंज’वर येण्याचा निरोप धाडला होता.
पक्षाचा निरोप येताच टेंगले, कोरी यांच्यासह राजीनामा दिलेले पदाधिकारी थेट ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘कृष्णकुंज’ वर गेले होते. सोमवारी ठाकरे यांनी टेंगले यांच्यासह नाराज पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तर मंगळवारी जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याशी चर्चा केली. याबाबत बोलताना टेंगले म्हणाले, दोन्ही दिवशी सविस्तर चर्चा झाली. पक्ष वाढीसाठी जोमाने काम करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. यापुढे काही अडचण असल्यास थेट संपर्क साधा असेही त्यांनी सांगितले आहे.