ड्रेनेज तुंबल्याने महिला आक्रमक, अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून महापालिका कार्यालयाला ठोकले टाळे
प्रतिनिधी / मिरज
शहरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनजचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ड्रेनेज पाईपलाईन दुरूस्त करावी, अशी वारंवार मागणी करुनही महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सोमवारी संतप्त झालेल्या महिलांनी महापालिका विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ड्रेनेजचे पाणी ओतून रोष व्यक्त केला. निवेदन स्विकारण्यास अधिकारीही उपस्थित नसल्याने अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून तसेच कार्यालयाला टाळे ठोकून निषेध करण्यात आला.
शिवसेनेचे डॉ. महेशकुमार कांबळे, चंद्रकांत मैगुरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अखेर सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून तात्काळ काम सुरू करण्याची ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.