आयुक्त नितीन कापडणीस यांचे नागरिकांना आवाहन
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन ; टपाल, बारनिशी, माहिती अधिकार कक्ष बंद
प्रतिनिधी / सांगली
महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना महापालिकेत येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. महापालिकेत दैनंदिन कामकाजाच्या वेळेत नगरसेवक, पदाधिकारी यांना
भेटण्यासाठी तसेच अधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या निमित्ताने नागरिकांची महापालिका कार्यालयांमध्ये वर्दळ सुरु असते. त्यामुळे नागरिकांची गर्दी विविध विभागात दिसून येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी न येण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून महापालिकेच्या दोन्ही उपायुक्त, सर्व प्रभाग समिती कार्यालय, माहिती अधिकार कक्ष तसेच इतर विभागातील सर्व टपाल शाखेत, बारनिशी विभागात थेट पत्र व्यवहार, अर्ज किंवा निवेदन स्वीकारणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या smkcorporation@gmail.com या ई मेलवर अर्ज किंवा पत्रव्यवहार सादर करावा असे आवाहन केले आहे.