सांगली/प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महापौर पदासाठी गीता सुतार यांना तर उपमहापौर पदासाठी आनंदा देवमाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघा उमेदवारांनी आज, सोमवारी (दि.3) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, गटनेते युवराज बावडेकर, स्थायी समिती सभापती संदीप आवटी, माजी महापौर संगीता खोत, माजी उपमहापौर धिरज सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
दरम्याम महापौर, उपमहापौर निवडणुकीत चमत्कार घडविण्यासाठी काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीनेही दंड थोपटले आहेत. आघाडीकडून महापौर पदासाठी काँग्रेसच्या वर्षा अमर निंबाळकर, राष्ट्रवादीच्या मालन हुलवान तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे मनोज सरगर, राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांनी अर्ज दाखल केले. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर हरवून शिकलगार यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.