प्रतिनिधी / इस्लामपूर
उरुण-इस्लामपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष व शिंपी समाज संघटनेचे नेते ॲड. सुधीर सीताराम पिसे यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. इस्लामपूरच्या राजकारणात ते अनेक वर्षे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून राहिले. उद्योजक म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पुणे येथे उपचार घेवून ते सध्या त्यांच्या इस्लामपूर येथील निवासस्थानी होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या रुपाने एक उत्साही व हरहुन्नरी नेता गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.